हैदराबादमधील प्रचारसभेत ओवेसी बंधूंना आव्हान देताना भाजपा नेत्या नवनीत कौर राणा यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या हैदराबाद आणि तेलंगाणामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग दोन्ही भावांना कुठून आले आणि कुठून गेले हे कळणारही नाही, असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं होतं. राणांच्या या विधानानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांना दिला आहे.
नवनीत राणा यांना पुन्हा एकदा इशारा देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी माझ्या छोट्या भावाला खूप समजावून रोखून धरले आहे. त्याला मोकळं सोडू का? एकदा जर तो सुटला तर तो माझ्याशिवाय कुणाच्या बापाचंही ऐकत नाही. तुम्हाला माहिती नाही आहे माझा छोटा भाऊ काय चिज आहे ते. माझा छोटा भाऊ तोफ आहे. मीच त्याला रोखून धरलेलं आहे, अन्यथा... ज्या दिवशी मी सांगेन की, मियाँ मी आराम करतो, आता तू सांभाळ, त्यानंतर…’असा सूचक इशारा ओवेसी यांनी दिला आहे. ओवेसी पुढे म्हणाले की, सध्यातरी तो एकेरी धावा घेत आहे. मी जर उद्यापासून बॅटिंग सुरू कर, असं सांगितलं तर टी-२०चा सामनाच सुरू होईल. मग तुमचं काय होईल ते पाहा.
महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हैदराबादमधील एका प्रचारसभेत केलेल्या विधानामुळे या वादाला तोंड फुटलं होतं. अकबरुद्दीन ओवेसा म्हणतात की पोलिसांना १५ मिनिटे हटवा, मग आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ. मात्र मी म्हणते की, तुम्हाला पंधरा मिनिटं लागतील, तर आम्हाला १५ सेकंद पुरेसे ठरतील. पोलिसांना १५ सेकंदासाठी हटवले तर छोट्या आणि मोठ्या कुठून आले आणि कुठे गेले हे कळणारही नाही, असा इशारा राणा यांनी दिला.
दरम्यान, नवनीत राणा यांच्या या विधानावर रेवंत रेड्डी यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी एक खटला दाखल केला पाहिजे. तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदारांना अटक केली पाहिजे. तर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, १५ सेकंद नाही तर पूर्ण एक तास घ्या. मानवता शिल्लक आहे की नाही हे आम्हालाही पाहायचं आहे.