Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षांनी जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचा पराभव करण्याचा चंग इंडिया आघाडीने बांधला आहे. मात्र, काँग्रेसमधील गळती थांबताना दिसत नाही. यावरून एका मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना, काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही. कारण उमेदवार जिंकून आला तरी कालांताने तो भाजपामध्येच येईल, असा खोचक टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकले तरी कालांतराने भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही
काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराला पक्षात राहायचे नाही, सर्वांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे. एक वगळता काँग्रेसमधून विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना भाजपमध्ये आणणार आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणार आहेत, असा दावा करताना, आम्ही अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काम करत आहोत. अल्पसंख्यक तरुणांना लाच न देता काम मिळत आहे. भाजपा करीमगंज आणि नागाव जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या महिन्यात आसाममधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील हिमंता बिस्वा सरमा सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आसामचे मंत्री आणि हिमंता यांचे सहकारी पीयूष हजारिका यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या चार सांगितली होती.