Nitish-Lalu Meets Sonia Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आरजेडी सुप्रीमो लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रविवारी 10 जनपथ येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त आयएनएलडीच्या 'सन्मान दिवस रॅली'नंतर लालू यादव यांच्यासह नितीश कुमार 10 जनपथवर पोहोचले.
बिहारमध्ये नवे सरकार आल्यानंतर नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांची पहिल्यांदाच भेट झाली आहे. याशिवाय लालू यादव दीर्घकाळानंतर 10 जनपथवर पोहोचले आहेत. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीवर चर्चा झाली. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी शनिवारी भाजपचा सफाया होईल, असे म्हटले होते. बिहारच्या सत्ताधारी महाआघाडीवरुनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला.
चारा घोटाळ्यातील शिक्षा आणि अनेक आजारांमुळे लालू सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. रविवारी दिल्लीत पोहोचल्यानंतर आरजेडी प्रमुख म्हणाले, "अमित शहा वेडे झाले आहेत. बिहारमधील त्यांचे सरकार पाडण्यात आले, 2024 मध्येही त्यांचा (भाजप) सफाया होईल. बिहारमध्ये जंगल राज असल्याचे शहा म्हणतात. गुजरातमध्ये त्यांनी काय केले, गुजरातमध्येही जंगल राज आहे," अशी टीका लालुंनी केली.