लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देताना व्यक्त केला होता. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांच्या राज्यवार दौर अद्याप अपूर्ण असून आयोग १३ मार्चनंतरच लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील संवेदनशील बुथ, मतदारसंघांची लिस्ट मागितली आहे. तसेच अन्य राज्यांकडूनही तशी यादी दिली जाणार आहे. यामुळे यावेळची निवडणूक ही ७ ते ८ टप्प्यांत घेतली जाण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्येही लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत झाली होती. १० मार्चला निवडणुकीची घोषणा आणि ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. २३ मे रोजी निकाल जाहीर झाले होते. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ECI अनेक राज्यांना भेट देत आहे. हा दौरा पूर्ण झाल्यावर तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सध्या निवडणूक आयोगाचे अधिकारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. हे दौरे १३ मार्चपूर्वी संपतील असे आयोगाला अपेक्षित आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की ईव्हीएमची वाहतूक, सुरक्षा दलांची गरज, सीमांवर बंदोबस्त ठेवण्यासंबंधी ही योजना आखली जात आहे.