धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 05:08 PM2024-05-22T17:08:07+5:302024-05-22T17:08:53+5:30
जात, समाज, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला निवडणूक आयोगाने फटकारले.
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून या टीका-टिप्पण्यांची पातळी घसरल्याचे दिसत आहे. दरम्यान, हाच निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा लक्षात घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) देशातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी निर्देश जारी केले आहेत.
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
धार्मिक विधाने टाळा
निवडणूक प्रचाराचा घसरलेला दर्जा पाहता आयोगाने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना अयोग्य विधाने न करण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचारात राहण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जात, समुदाय, भाषा आणि धर्माचे नाव घेऊन प्रचार करणाऱ्या भाजप आणि काँग्रेस, या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने फटकारले. निवडणुकीमुळे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणावर परिणाम होऊ नये, असेही आयोगाने म्हटले आहे.
Election Commission of India (ECI) directs BJP president JP Nadda and Congress president Mallikarjun Kharge to issue formal notes to star campaigners to correct their discourse, exercise care and maintain decorum. Commission’s unprecedented orders to BJP and INC in the wake of… pic.twitter.com/3kChnLGGL0
— ANI (@ANI) May 22, 2024
निवडणूक आयोगाने पुढे म्हटले की, भाजप आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात धार्मिक आणि सांप्रदायिक वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे आणि समाजात फूट पाडणारी भाषणे बंद करावी. तसेच, अग्निवीर योजना आणि भारतीय संरक्षण दलांचे/ भारतीय सैन्याचे राजकारण न करण्याचा सल्ला काँग्रेसच्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना दिला.