नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. आतापर्यंत ६ टप्पे पूर्ण झालेत. त्यात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेला दावा भाजपा नेत्यांची झोप उडवणारा आहे. बिहारमध्ये एनडीएला मोठं नुकसान होऊ शकतं. भाजपाला देशात २४० ते २६० जागा मिळू शकतात तर एनडीएच्या सहकारी पक्षांना ३५ ते ४५ जागा मिळतील असा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर योगेंद्र यादव यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यात काँग्रेसला ५० ते १०० जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. त्यासोबत काँग्रेसवगळता इंडिया आघाडीला १२० ते १३५ जागा मिळू शकतात. त्यामुळे भाजपाचा अबकी बार ४०० पारचा नारा धोक्यात आला असून भाजपाला ३०० जागाही मिळणं कठीण झाल्याचं योगेंद्र यादव यांच्या दाव्यातून दिसतं. भाजपा बहुमताच्या २७२ आकड्यापासूनही खाली येऊ शकते. सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपा २५० जागांहून कमी येतील असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.
तर इंडिया आघाडीला बहुमत मिळताना दिसत नाही. त्यांना २०५ ते २३५ जागा मिळू शकतात. परंतु सातव्या टप्प्यातील उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काही मोठे फेरबदल होऊ शकतात. जर वास्तवात तसं झालं तर इंडिया आघाडी एनडीएच्या पुढे जाऊ शकते. परंतु सध्या तरी इंडिया आघाडी मागे आहे. माझ्याकडे कुठलेही एक्झिट पोल नाहीत परंतु जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हे सांगतोय असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले.
भाजपाला कुठल्या राज्यात किती नुकसान होईल?
- केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये भाजपाला २ जागांची वाढ होईल. भाजपासोबत आघाडीलाही २ जागा मिळू शकतात.
- आंध्र प्रदेशात भाजपा, टीडीपी आणि जनसेनेची आघाडी आहे. याठिकाणी १५ जागा येऊ शकतात. तेलंगणात काँग्रेस आणि भाजपात लढत आहे. इथं काँग्रेस, भाजपा दोघांच्या जागा वाढतील. भाजपा याआधी ४ जागांवर जिंकली होती आता आणखी ४ जागांची वाढ होईल.
- ओडिसात भाजपाकडे ८ जागा होत्या, त्यात ४ जागा वाढतील. एकूण १३ जागांचा फायदा या राज्यात होऊ शकतो.
- कर्नाटकात भाजपाला १२ जागांचे नुकसान होऊ शकते. मागील निवडणुकीत इथं २५ जागा होत्या ज्यातील १३ जागांवर विजय मिळू शकतो.
- पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडे १८ जागा होत्या, त्यात कुठलीही वाढ अथवा घट दिसत नाही.
- पूर्वोत्तर भारतात मागील वेळच्या तुलनेत यंदा भाजपा चांगली कामगिरी करेल.
- महाराष्ट्रात मागील निवडणुकीत एनडीएला ४२ जागांवर विजय मिळाला होता. यंदा याठिकाणी २० जागांचे नुकसान होईल. १५ जागांवर मित्रपक्षाला तर ५ जागांवर भाजपाला नुकसान होईल.
- राजस्थान, गुजरातमध्येही भाजपाला १० जागांचे नुकसान होईल
- मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथे भाजपाच्या १० जागांचे नुकसान होईल
- हरियाणा, दिल्लीत भाजपाच्या १० जागांवर फटका
- पंजाब, चंदिगड, हिमाचल, जम्मू काश्मीर या राज्यातही भाजपाला ५ जागांचा फटका बसेल
- उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथे १० जागांचे नुकसान
- बिहारमध्ये मागील निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, यंदा येथेही ५ जागांचा फटका बसेल. तर एनडीएला १० जागांवर नुकसान होईल.
एकूण ५५ जागांचे भाजपाला नुकसान
एकूण भाजपाला ५५ जागांवर नुकसान होतानाचे चित्र दिसतंय. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. त्यातील ५५ जागा कमी केल्या तर हा आकडा २४८ जागांवर जातो. तर एनडीएच्या सहकारी पक्षांना २५ जागांचा फटका बसतोय जो मागच्या निवडणुकीत १५ जागांचा फायदा झाला होता असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले.