मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप खासदाराने भाजपच्याच आमदाराला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता भाजप खासदार आणि प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकण्यात आला. या हल्ल्यामुळे भाजप बूटफेक फेऱ्यात अडकलंय का अशी चर्चा रंगत आहे.
दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपनेते राव पत्रकारांशी संवाद साधत होते. त्याचवेळी राव यांच्यावर बूट फेकण्यात आला. फेकलेला बूट सिम्हा राव यांच्या चेहऱ्याला लागला. या घटनेनंतर आरोपीला ताबडतोब पकडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
याआधी उत्तर प्रदेशातील खासदार शरद त्रिपाठी यांनी विधानसभा सदस्य राकेश सिंग बघेल यांना मारहाण केली. विषेश म्हणजे त्रिपाठी यांनी आमदार बघेल यांना बुटानेच झोडपले होते. त्यामुळे भाजपवरील बुटाचे ग्रहन सुटत नसल्याचे चित्र आहे.
या व्यतिरिक्त बारगढ जिल्ह्यात एक बैठकीत मार्गदर्शन करत असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावर एक व्यक्तीने बुट फिरकावला होता. हा बूट सुदैवाने मुख्यमंत्र्यांना लागला नव्हता. त्यानंतर सुरक्षरक्षकांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले होते.