भिंड (मध्यप्रदेश): भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत आला तर तो गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसींना अनेक हक्क देणारी राज्यघटना फाडून फेकून देईल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ते मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत होते. राज्यघटनेची प्रत हातात धरून ते म्हणाले की, आताची लोकसभा निवडणूक ही सामान्य निवडणूक नसून दोन विचारसरणींमधील आरपारची लढाई आहे. राज्यघटनेमुळे गरीब, दलित, आदिवासी व ओबीसींना अनेक हक्कांसह मनरेगा, जमीन हक्क, शिक्षण, नोकऱ्यांत आरक्षण व इतरही अनेक गोष्टी दिल्या आहेत.
भाजप सत्तेत आल्यास तो राज्यघटना फाडून फेकून देईल. पंतप्रधान, अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री) आणि त्यांच्या खासदारांनी तसे ठरवले आहे. राज्यघटना फेकून द्यावी, असे त्यांना वाटते. जर केंद्रातील सरकार २२-२५ उद्योगपतींना अब्जाधीश बनवू शकते, तर काँग्रेस करोडो महिलांना निश्चितपणे लखपती बनवेल. भिंड लोकसभा (राखीव) मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार संध्या राय यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार फुलसिंग बरैया यांना उमेदवारी दिली आहे. (वृत्तसंस्था
आरक्षणाला विरोध नाही मग सरकारी कंपन्यांचे खासगीकरण का?
यावेळी राहुल यांनी आरक्षणाच्या * मुद्द्यावरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रातील सत्ताधारी आरक्षणाच्या विरोधात नसतील तर ते मग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे (पीएसयू) खासगीकरण का करत आहे, असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजनेद्वारे कोट्यवधी महिलांना 'लखपती बनवले जाईल. महिलांना लक्षाधीश बनवण्यासाठी सरकार दरवर्षी एक लाख रुपये (रु. ८,५०० दरमहा) त्यांच्या बँक खात्यावर पाठवेल, या घोषणेचा पुनरुच्चार राहुल यांनी केला.