CM Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काँग्रेस नेत्याने पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचा साठा असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रे कुचकामी असून, ती वापरण्याइतका पैसाही त्या देशाकडे नाही. त्यामुळे ती विकून टाकण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे असं म्हणत काँग्रेसला सुनावलं होतं. यावरुन पाकिस्तानी नेत्यांनीही भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केलं.
भारतात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीवर पाकिस्तानचे बारीक लक्ष आहे. या निवडणुकीमुळे पाकिस्तान विनाकारण त्रास होताना दिसतोय. पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत नाक खुपसलं. फवाद चौधरी यांनी भारताच्या कारभारात ढवळाढवळ करण्याची नेहमीचीच सवय असल्याचे हे पुन्हा एकदा समोर आलं. चौधरी फवाद हुसेन यांनी यापूर्वी राहुल गांधींचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता निवडणुकीवर चौधरी यांनी भाष्य केलं.
सोमवारी देशभरात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुटुंबासोबतचा एक फोटो पोस्ट केला. यावर फवाज चौधरींनी केजरीवाल यांचा हा फोटो पुन्हा शेअर करून त्यावर कमेंट केली. मात्र, पाकिस्तानी नेत्याच्या या वक्तव्यावर केजरीवाल संतापले आहेत.
पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो पुन्हा शेअर केला आणि म्हटलं की, "शांतता आणि सद्भावनेसाठी द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करा." यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी चौधरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
"चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील जनता आपले प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्विटची गरज नाही. सध्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या. भारतात होणाऱ्या निवडणुका हा आमचा अंतर्गत विषय आहे. भारत दहशतवादाच्या सर्वात मोठ्या प्रायोजकांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही," असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले. यानंतर त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि हुकूमशाही विचाराविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.