काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक, उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:20 PM2024-03-06T23:20:43+5:302024-03-06T23:26:05+5:30
Lok Sabha Election : या समितीमध्ये माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही समावेश आहे.
Lok Sabha Election : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या नावांची पहिली यादी निश्चित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही समावेश आहे.
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या काँग्रेस समितीनेही मसुदा तयार केला आहे. आता काँग्रेस कार्यकारिणी यावर चर्चा करणार आहे.
जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की,आम्ही जाहीरनाम्याचा मसुदा तयार केला आहे. आता तो काँग्रेस कार्यकारिणीसमोर मांडला जाणार आहे. समितीच्या बैठकीत याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर हा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बनेल. उद्या ते काँग्रेस अध्यक्षांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात
यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, यावेळी प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात. ही जागा काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. सध्या सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र यावेळी सोनिया राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवू शकतात.