Lok Sabha Elections 2024 Exit Poll : काल, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि लगेच सायंकाळी एक्झिट पोलदेखील समोर आले. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील NDA ला प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता या एक्झिट पोलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रशांत किशोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे अनेक पत्रकार आणि काही नेत्यांची खरडपट्टी काढली. ते म्हणाले की, "पुढच्या वेळेस जेव्हा राजकारण आणि निवडणुकीवर चर्चा होतील, तेव्हा तुमचा मौल्यवान वेळ खोटे पत्रकार, बडबड करणारे नेते आणि सोशल मीडियावरील स्वयंभू जाणकारांना ऐकण्यात वाया घालवू नका." दरम्यान, प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागा जिंकेल, असा दावा केलेला आहे.
विशेष म्हणजे, एक्झिट पोलचे कल जाहीर होण्याच्या काही तास आधीच प्रशांत किशोर यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या कामगिरीबद्दल त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा पुनरुच्चार केला होता. प्रशांत किशोर म्हणाले, "माझ्या मूल्यांकनानुसार भाजप 2019च्या आकड्यांच्या जवळपास किंवा थोडी चांगली कामगिरी करेल. पश्चिम आणि उत्तर भारतातील जागांच्या संख्येत कोणताही विशेष बदल होणार नाही, पण तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या जागा वाढतील, असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजप 2019 पेक्षा चांगली कामगिरी करत आहे. काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजप आणि मित्रपक्षांना 360-370 जागा मिळत आहेत, तर काही एक्झिट पोल 400 पेक्षा जास्त किंवा अगदी जवळपास जागा मिळण्याचा दावा करत आहेत. आता हे एक्झिट पोल किती खरे ठरतात, हे येत्या 4 जून रोजी कळेलच.