यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि आपमध्ये झालेली आघाडी, तसेच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, आज आलेल्या एक्झिट पोलमधून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबतची कुठलीही सहानुभूती इंडिया आघाडीला मिळताना दिसत नाही आहे. दिल्लीमध्ये भाजपा पुना एकदा ६ ते ७ जागा जिंकताना दिसत आहे.
मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये भाजपाने ७ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळी काय निकाल लागणार याबाबत उत्सुकता आहे. आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार दिल्लीमध्ये भाजपाला ५४ टक्के मतं मिळण्याची शक्यता असून, काँग्रेस आणि आपच्या इंडिया आघाडीला ४४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. जागांचा विचार करायचा झाल्यास दिल्लीमध्ये भाजपाला ६ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडियाय आघाडीला ० ते १ जागा मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमधूनही दिल्लीमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचं भाकित करण्यात आलं आहे. या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपाला ६ ते ७ आणि इंडिया आघाडीला ० ते १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाईम्स नाऊ नवभारत ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ५४ टक्के मतांसह ७ पैकी ७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.