सात टप्प्यात चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज आटोपल्यानंतर सर्वांचं लक्ष विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून होणाऱ्या एक्झिट पोलकडे लागले होते. एकीकडे नरेंद्र मोदींनी केलेली ४०० पार जागा जिंकण्याची घोषणा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी उभं केलेलं मोठं आव्हान यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असेल याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, संध्याकाळपासून प्रसिद्ध होत असलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सुमारे ३५० ते ३८० च्या टप्प्यात जागा देण्यात आल्या. मात्र तीन एक्झिट पोल असेही आले, ज्यामधून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० पार जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकालांमध्ये एनडीए खरोखरच ४०० पार मजल मारणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोल पैकी इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया, न्यूज २४ टुडेज चाणक्य आणि इंडिया टीव्ही सीएनएक्स या एक्झिट पोलमधून भाजपा ४०० पार मजल मारेल, असा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी मागच्या काही काळात अचूक एक्झिट पोलमुळे प्रसिद्धीस आलेल्या इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३६१ ते ४०१, इंडिया आघाडीला १३१ ते १६६ आणि इतरांना ८ ते २० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
तर न्यूज २४ टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने एनडीएला ४००, इंडिया आघाडीला १०७ आणि इतरांना १५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. टुडेज चाणक्यने आपल्या पोलमधून महाराष्ट्रातही महायुतीला ३३ आणि महाविकास आघाडीला १५ जागा मिळतील, असा दावा केला आहे.
तर इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३७१ ते ४०१, इंडिया आघाडीला १०९ ते १३९ आणि इतरांना २८ ते ३८ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.