यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतचा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल काल रात्री प्रसिद्ध झाले. या एक्झिट पोलपैकी बहुतांश पोलमधून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएची सत्ता कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे दिसत होते. मात्र निवडणूक पुढे सरकत गेल्यावर उत्तरोत्तर इंडिया आघाडीचं पारडं जड होत जाताना दिसलं. एक्झिट पोलमधून एनडीएच्या मोठ्या विजयाचे दावे केले जात आहेत. बहुतांश एक्झिट पोलमधून एनडीएला ३५० ते ४०० पर्यंत जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये पाच राज्य अशी आहेत जिथे भाजपा आणि एनडीए धक्कादायक कामगिरी करताना दिसत आहे. या पाच राज्यांतील भाजपा आणि एनडीएच्या मुळे कामगिरीमुळे इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे.
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि एनडीएला अनपेक्षितरीत्या जास्त जागा मिळताना दिसत आहेत. आतापर्यंत प्रादेशिक पक्षांचा बोलबाला असलेल्या या राज्यांमध्ये भाजपा प्रबळ होताना दिसत आहे. तसेच एक्झिट पोलमधील हा अंदाज प्रत्यक्षात उतरल्यास तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल.
आता ज्या पाच राज्यांमधील निकालांमुळे इंडिया आघाडीचं गणित बिघडणार आहे, त्यातील पहिलं राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये मागच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. मात्र यावेळी भाजपा, तेलुगु देसम आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने चित्र पूर्णपणे उलटवलं आहे. यावेळी आंध्र प्रगेशमध्ये एनडीएला २१ ते २३ जागा मिळू शकतात. तर वायएसआर काँग्रेसला २ ते ४ जागा मिळू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचा एकही जागा मिळण्याची शक्यता नाही.
इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल लागणारं दुसरं राज्य आहे ते म्हणजे ओदिशा. ओदिशामध्ये लोकसभेच्या एकूण २१ जागा आहेत. तसेच ओदिशामध्ये यावेळी भाजपाला बंपर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ओदिशामध्ये १८ ते २० जागा मिळू शकतात. तर सत्ताधारी बिजू जनता दलाला ० ते २ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर ओदिशामध्ये इंडिया आघाडीला ० ते १ जागा मिळू शकते.
एक्झिट पोलमधून जबरदस्त धक्कादायक निकालाचा दावा करण्यात आलेलं तिसरं राज्य तेलंगाणा ठरणार आहे. तेलंगाणामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र पाच महिन्यांतच येथील चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या १७ जागा असलेल्या तेलंगाणामध्ये भाजपासा ११ ते १२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसला ४ ते ५ जागा मिळतील, असा दावा करण्यात येत आहे. तर एमआयएमला ० ते १ जागा मिळू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे दहा वर्षे तेलंगाणावर राज्य करणाऱ्या बीआरएसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही.
इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता असलेल्या राज्यांच्या यादीतील चौथं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय उलथापालथी, पक्षांची झालेली फोडाफोडी यामुळे येथे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र महाराष्ट्रात काही नुकसान होत असलं तरी महायुती २८ ते ३२ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १६ ते २० जागा मिळू शकतात.
इंडिया आघाडीच्या अपेक्षांवर पाणी फिरवणारं पाचवं राज्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपाला २६ ते ३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला ११ ते १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि डाव्या पक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात. मागच्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाला १८ जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३६१ ते ४०१ जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. तर इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा देण्यात आल्या होत्या. तर इतरांना ८ ते २० जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.