नवी दिल्ली : पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. मात्र भाजपप्रणीत एनडीए आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळण्याबाबत एक्झिट पोलमध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे.
इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.
भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ ते ३५० व इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.
केंद्रात ‘एनडीए’ला पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांनी केले विक्रमी मतदान : पंतप्रधानकेंद्रात एनडीए सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान केले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. इंडिया आघाडीचे प्रतिगामी राजकारण मतदारांनी नाकारले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील मतदारांनी माझ्या सरकारच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण केले आहे. या सरकारच्या कामामुळे देशातील गरीब, तळागाळातील तसेच वंचित लोकांच्या जीवनमानात झालेला चांगला बदल लोकांनी पाहिला आहे. लोकसभा निवडणुकांत मतदान केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मतदानामध्ये नारीशक्ती व युवा शक्तीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ही उत्साह वाढविणारी घटना आहे, असेही ते म्हणाले.पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज आपला देश जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आमच्या सरकारच्या प्रत्येक योजनांचे लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यात भेदभाव झाला नाही. इंडिया आघाडी संधिसाधू, जातीयवादी व भ्रष्टाचारी आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचे समर्थन व रक्षण करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.
दक्षिण भारत, प. बंगालमध्ये एनडीएची कामगिरी सुधारणार यावर सर्वच एक्झिट पोलचे एकमतयंदा दक्षिण भारत व पश्चिम बंगालमध्ये एनडीएची कामगिरी सुधारणार याबाबत सर्वच एक्झिट पोलचे एकमत आहे. आंध्र प्रदेशात एनडीएला २५ पैकी १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणातील १७ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर भाजपला विजय मिळेल, असा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये किमान दोन जागा तर केरळमध्ये एक जागा जिंकून भाजप त्या राज्यांत खाते उघडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१९मध्ये भाजपने २२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा अधिक यश बंगालमध्ये यंदाच्या निवडणुकांत मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.