चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 10:13 AM2024-06-02T10:13:25+5:302024-06-02T12:10:08+5:30

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या जवळपास सगळ्या एक्झिट पोलमधून  मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा दावा केला जात असताना एका एक्झिट पोलने मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) २५० जागांपर्यंत मजल मारणंही कठीण होईल. तर काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील इंडिया आघाडी (INDIA Opposition Alliance) बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचेल, असा दावा केला आहे.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: The shocking prediction of this exit poll is that the NDA will not even get 250 seats, let alone 400  | चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 

चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 

लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काल विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रामध्ये पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा दावा करण्यात आला आहे. या एक्झिट पोलमधून भाजपा ३०० हून अधिक तर एनडीएला ३५० ते ४०० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सगळ्या एक्झिट पोलमधून  मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा दावा केला जात असताना एका एक्झिट पोलने मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला २५० जागांपर्यंत मजल मारणंही कठीण होईल. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचेल, असा दावा केला आहे.

हिंदी वर्तमानपत्र देशबंधूने डीबी लाईव्ह या युट्युब चॅनेलवरून प्रसारित केलेल्या या एक्झिट पोलमधून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू लोकसभा किंवा इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या दाव्यांनुसार मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २०७ ते २४१ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला २५५ ते २९० जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर इतरांच्या खात्यात २९ ते ५१ जागा जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

काही प्रमुख राज्यांबाबत या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला ३२ ते ३४ तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४६ ते ४८ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला २८ ते ३० आणि महायुतीला १८ ते २० जागांवर समाधान मानावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीला २४ ते २६ तर एनडीएला १४ ते १६ जागा मिळतील, असा दावाही या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे. 

तर काँग्रेसला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसला १८ ते २० तर एनडीएला ८ ते १० जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २६ ते २८ आणि भाजपाला ११ ते १३ आणि काँग्रेसला २ ते ४ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तसेच तामिळनाड़ूमध्ये इंडिया आघाडीला ३७ ते ३९ जागा मिळतील, अशी शक्यताही या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. 

मात्र काल प्रसिद्ध झालेल्या अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला ३५० ते ४०० पर्यंत जागा देण्यात आल्या होत्या. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया, न्यूज २४  टुडेज चाणक्य आणि इंडिया टीव्ही सीएनएक्स या एक्झिट पोलमधून भाजपा ४०० पार मजल मारेल, असा दावा करण्यात आला आहे.इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३६१ ते ४०१, इंडिया आघाडीला १३१ ते १६६ आणि इतरांना ८ ते २० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.  तर न्यूज २४ टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने एनडीएला ४००, इंडिया आघाडीला १०७ आणि इतरांना १५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३७१ ते ४०१, इंडिया आघाडीला १०९ ते १३९ आणि इतरांना २८ ते ३८ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Web Title: Lok Sabha Election Exit Poll Results 2024: The shocking prediction of this exit poll is that the NDA will not even get 250 seats, let alone 400 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.