नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.
गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. १९६७ मध्ये मतदारसंघ झाल्यापासून अमेठी गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. तेव्हापासून सुमारे ३१ वर्षे गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७७मध्ये जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केले हाेते. त्यानंतर संजय गांधी यांनी १९८०मध्ये पुन्हा येथून विजय मिळविला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर १९८१मध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले हाेते. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत सतीश शर्मा विजयी झाले हाेते. २०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५,००० हून अधिक मतांनी पराभव केल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला भंग झाला होता.
आदेशाचे पालन करणार
मी कायम गांधी कुटुंबाचा सेवक राहिलाे आहे. गांधी कुटुंबाने एका सेवकाला जबाबदारी साेपविली आहे. ती मी पार पाडणार. गांधी कुटुंबानेच अमेठीतून लढावे, हीच माझी इच्छा हाेती. मात्र, त्यांनी आदेश दिला आणि सेवक म्हणून ताे स्वीकार करुन निवडणूक लढविणे, हा माझा धर्म आहे.
- किशाेरी लाल शर्मा, उमेदवार, काॅंग्रेस.
त्यांनी पराभव स्वीकारला
अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधी कुटुंबाची अनुपस्थिती हे सूचित करते की, काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता वाटली असती, तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती आणि त्यांच्या वतीने उमेदवार उभे केले नसते.
-स्मृती इराणी, उमेदवार, भाजप.
यापूर्वी बिगर गांधी घरण्याच्या उमेदवार झाला होता पराभूत
nशेवटच्या वेळी १९९८ मध्ये या मतदारसंघातून बिगर-गांधी उमेदवार रिंगणात होते.
nतेव्हा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे जवळचे सहकारी सतीश शर्मा यांनी निवडणूक लढवली होती; परंतु भाजपच्या संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.
nसोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये सिंह यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा पुन्हा जिंकली होती.
n२००४ मध्ये राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यासाठी सोनिया गांधी लगतच्या रायबरेली मतदारसंघात गेल्या. राहुल यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग तीन वेळा मतदारसंघातून विजय मिळविला.