NDAसाठी आनंदाची बातमी, सर्व्हेमध्ये 400 पार; सर्व विक्रम मोडणार! जाणून घ्या, भाजप किती जागा जिंकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:55 AM2024-03-15T09:55:57+5:302024-03-15T09:57:38+5:30
विशेषतः पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एनडीए 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपसाठी आंनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 400 हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. विशेषतः पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.
नेटवर्क18 ने केलेल्या मेगा ओपिनियन पोल नुसार, एनडीएला 411 जागा मिळू शकतात. लोकसभेची एकूण संख्या 543 एवढी आहे. मात्र, 370 जागा जिंकण्याचा दावा करत असलेला भाजप आपल्या लक्ष्यापासून मागे राहू शकतो. ओपिनियन पोलनुसार, या निवडणुकीत भाजपला 350 जागा मिळू शकतात. असे झाले तर, भाजपला 2019 च्या तुलनेत 47 जागा अधिक मिळतील.
कुठे किती जागा मिळतील -
सर्व्हेनुसार, एनडीएला उत्तर प्रदेशात 80 पैकी 77, मध्य प्रदेशात 28, छत्तीसगडमध्ये 10, बिहारमध्ये 38, झारखंडमध्ये 12 जागा मिळू शकतात. तर एनडीएला कर्नाटकात 25, तामिळनाडूमध्ये 5 तर केरळमध्ये 2 जागा मिळू शकतात. येशिवाय अनेक राज्यांमध्ये एनडीएचा ग्राफ वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात ओडिशामध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 25, तेलंगनामध्ये 8, आंध्र प्रदेशात 18 जागा, तर गुजरातमध्ये एनडीएला 26 जागा मिळू शकतात.
I.N.D.I.A. चं काय होणार? -
ओपिनियन पोलनुसार, विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. ला 105 जागा मिळताना दिसत आहेत. तर, सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 49 जागाच मिळू शकतात. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसला केवळ 44 जागाच मिळाल्या होत्या.