Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या बिष्णुपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला. 'बंगालमध्ये सुपडा साफ होणार असल्यामुळे तृणमूल घाबरली आहे. त्यामुळेच आता त्यांनी मानवतेची सेवा करणाऱ्या सनातन समाजाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या दबावाखाली आणि त्यांची मते मिळविण्यासाठी संतांना आणि प्रतिष्ठित संस्थांना जाहीरपणे शिव्या देत आहेत, अशी टीका मोदींनी केली.
TMCला फक्त व्होटबँकेची चिंता ते पुढे म्हणतात, टीएमसी बंगालच्या परंपरेचाही अपमान करत आहे. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहादचे आवाहन करतात. हे लोक राममंदिराबाबत वारंवार वादग्रस्त आणि फालतू विधाने करतात. टीएमसीला फक्त त्यांच्या व्होट बँकेची काळजी आहे. बंगाल सरकारचा हेतू वाईट आहे. राज्यातील गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून दिल्लीतून मोफत तांदूळ पाठवले जातात, पण टीएमसीने रेशनमध्येही घोटाळा करते. सरकारने पक्के घर बांधण्याची योजना आणली, पण सरकार लागू करत नाही.
टीएमसी-डावे-काँग्रेस एकच आहेटीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांचे मॉडेल विकासाचे नाही. टीएमसीचे वाळू माफिया बिनबोभाट आपला धंदा चालवत आहेत. टीएमसी असो, डावे असो की काँग्रेस असो, हे सर्व पक्ष वेगवेगळे दिसत असले तरी, सर्वांचे पाप सारखेच आहे. या लोकांनी मिळून इंडी अलायन्सची स्थापना केली. एकेकाळी इतर राज्यातील लोक रोजगारासाठी बंगालमध्ये येत असत, परंतु आता लोकांना कामासाठी येथून स्थलांतर करावे लागत आहे. राज्यात मोठ्या संख्येने निर्वासित राहतात. CAA अंतर्गत 300 कुटुंबांना नागरिकत्व मिळून दिले. बंगालमधील निर्वासितांनाही लवकरच नागरिकत्व मिळेल, त्यामुळे मोदींच्या हमींवर लोकांचा विश्वास वाढत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका निवडणूक रॅलीत भारत सेवाश्रम संघासारख्या प्रतिष्ठित धार्मिक संस्थेवर गंभीर आरोप केले. संघटनेतील साधू-संत भाजपला निवडणुकीत मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ममतांनी भारत सेवाश्रमचे संन्यासी प्रदिप्तानंद महाराज उर्फ कार्तिक महाराज यांचे थेट नाव घेत ते TMCच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचाही आरोप केला आहे. यावेली त्यांनी रामकृष्ण मिशन संस्थेवरही टीका केली. मिशनचे सदस्य दिल्लीच्या आदेशावर भाजपसाठी मते मागत असल्याचे ममतांनी म्हटले.