Jayant Sinha to BJP Notice : झारखंडच्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणूक प्रचारातून अंग काढून घेतलं होतं. त्यानंतर जयंत सिन्हा यांना भाजपने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. भाजपने हजारीबाग मतदारसंघातून सिन्हा यांच्याऐवजी मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सिन्हा यांनी प्रचारातून अंग काढून घेतले. त्यामुळे जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.
पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आदित्य साहू यांच्या पत्राला उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी हे पत्र लिहिली आहे. दोन पानी पत्र लिहून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये सिन्हा यांनी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं म्हटलं. तसेच मतदान न केल्याच्या आरोपावर जयंत सिन्हा यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्याचे सांगितलं. झारखंडच्या हजारीबाग येथील सिन्हा कुटुंब अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपने जयंत सिन्हा यांना उमेदवारी नाकारुन स्थानिक आमदार मनीष जयस्वाल यांना उभे करण्यात आले. त्यानंतर सिन्हा यांचे पुत्र आशीर सिन्हा हे इंडिया आघाडीच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. त्यामुळे जयंत सिन्हा काँग्रेसमध्ये जातील असे म्हटलं जात होतं.
"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती मला सांगायची आहे. मार्च २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, मी सक्रिय निवडणूक जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून मी जागतिक वातावरणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर काम करू शकेन. मी हा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता. यासोबतच मी पक्षासोबत काम करत राहणार आहे. गेल्या १० वर्षांपासून मला देश आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्ष नेतृत्वाने मला दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेतृत्वाचे आभार मानले आहेत," असे जयंत सिन्हा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
"पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला,सभेला किंवा बैठकीला मला निमंत्रित करण्यात आले नव्हते. बाबूलाल मरांडीजींना मला कार्यक्रमांमध्ये सामील करून घ्यायचे असते तर ते मला नक्कीच आमंत्रित करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. २९ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी, माझ्या दिल्लीतील वास्तव्यादरम्यान, मला मनीष जयस्वाल यांनी त्यांचा अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केले होते. उशीरा माहिती मिळाल्यामुळे, १ मे २०२४ च्या सकाळपर्यंत मला हजारीबागला पोहोचणे शक्य झाले नाही," असेही स्पष्टीकरण सिन्हा यांनी दिलं आहे.