उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मनेका गांधी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींबाबत मोठं विधान केलं आहे. दोघांचाही राजकारणी म्हणून विकास झालेला नाही असं म्हटलं आहे. मनेका गांधींकडून गांधी कुटुंबाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्या भाजपाकडून गांधी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करत आहेत. मनेका यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी हे एक नेता म्हणून परिपक्व नसल्याचं म्हटलं आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मनेका गांधी यांनी राहुल आणि प्रियंका यांच्यावर भाष्य केलं आहे. मला राहुल आणि प्रियंका हे राजकारणी म्हणून विकसित होताना दिसत नाहीत. मनेका गांधी यांना राहुल गांधी हे राजकीय नेते म्हणून विकसित होताना तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मनेका गांधींनी उत्तर दिलं की, मला वाटत नाही की त्यांचा अजिबात विकास झाला आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेवरही मोठं विधान केलं. मनेका म्हणाल्या की, केवळ पदयात्रा केल्याने माणूस विकसित होऊ शकत नाही. नेत्यामध्ये अनेक गुण असणं महत्त्वाचं असतं. कोणताही मुद्दा हाती घेणं, त्याचा सखोल अभ्यास करणं, नेतृत्व करणं, शौर्य दाखवणं या सर्व गोष्टी नेत्यासाठी आवश्यक असतात. मला वाटत नाही की ते (राहुल गांधी) विकसित झाले आहेत. हीच गोष्ट प्रियंका गांधींनाही लागू होते.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून देशात काँग्रेसची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोंडीत पकडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे. केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यावेळीही गांधी घराण्याची परंपरा असलेल्या रायबरेली येथून निवडणूक लढवत आहेत. त्याचवेळी प्रियंका गांधी याही सातत्याने आपलं राजकारण पुढे नेताना दिसत आहेत. मात्र, मनेका गांधी यांनी आपल्या विधानातून या दोघांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.