'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:29 PM2024-06-04T15:29:42+5:302024-06-04T15:30:32+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Lok sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला 300 चा आकडा पार करणेही कठीण बनले आहे. सत्ता भाजपची येईल, पण त्यांना नितीश कुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ लागणार आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांनाही बहुमतासाठी मित्रपक्षांची गरज भासणार आहे. अशातच, काँग्रेसनितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, नितीश कुमार NDA मध्येच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीश कुमार एनडीएमध्ये आहेत आणि एनडीएमध्येच राहतील, असे जेडीयूने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जेडीयू नेते केसी त्यागी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. मीडियाशी बोलताना केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील. आता आम्ही कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी निवडणुकीदरम्यानच स्पष्ट केले होते. त्यामुळे ते इंडिया आघाडीत जाण्याचे वृत्त खोटे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बिहारमध्ये एनडीएची आघाडी
बिहारमधील 40 जागांपैकी एनडीए 34 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी जनता दल युनायटेड 15 जागांवर तर भाजप 13 जागांवर पुढे आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 5 जागांवर अन् जीतन राम मांझी एका जागेवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीतील आरजेडी 3 जागांवर तर काँग्रेस आणि डावे तीन जागांवर पुढे आहेत.