Lok Sabha Election : आज(दि.26 ) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तसेच, तिसऱ्या टप्प्याचा प्रचारदेखील जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या अररियामध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी EVM-VVPAT बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही भाष्य केले. 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या तोंडावर चपराक आहे. हे लोक या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावत लोकशाहीला हानी पोहोचवणाऱ्या अशा याचिकांना काही अर्थ नसल्याचे सिद्ध केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बॅलेट पेपर आणि मतदान केंद्र लुटणाऱ्या लोकांना मोठा धक्का आहे, अशी टीकाही मोदींनी केली.
मतदान केंद्रे लुटली जायचीपंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, केंद्रात तुमचा हा सेवक आणि बिहारमध्ये नितीशजी संपूर्ण ताकदीने काम करत आहे. राजद आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला ना देशाच्या संविधानाची पर्वा, ना लोकशाहीची. अनेक दशके बॅलेट पेपरच्या बहाण्याने गरिबांचे हक्क हिसकावून घेणारे हेच लोक आहेत. यापूर्वी मतदान केंद्रे आणि बॅलेट पेपर लुटले जायचे. राजद आणि काँग्रेसच्या राजवटीत बॅलेट पेपरची कशी लूट झाली, याचे बिहारमधील जनता साक्षीदार आहे. गोरगरिबांना मतदान करण्यासाठीही घराबाहेर पडू दिले जात नसायचे. त्यांनी सातत्याने लोकशाहीचा विश्वासघात केला. आता आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, बॅलेट पेपरचे जुने युग परत येणार नाही.
विरोधकांनी EVMबाबत जनतेमध्ये शंका निर्माण केलीआता देशातील गरीब आणि प्रामाणिक मतदारांना ईव्हीएमची ताकद मिळाली, त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी लुटमार करणाऱ्या या लोकांना हेही सहन होत नाही. ते अजूनही चिंतेत आहे. त्यामुळेच शक्य होईल त्या मार्गाने ईव्हीएम काढून टाकण्याचे काम करत आहेत. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वाईट हेतूने ईव्हीएमची बदनामी करण्यात मग्न आहेत. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण करण्याचे पाप इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याने केले. देशाच्या लोकशाहीची ताकद बघा की, आज सर्वोच्च न्यायालयाने मतपेट्या लुटणाऱ्या लोकांना जोरदार दणका दिला. यामुळे त्यांची सर्व स्वप्ने चकनाचूर झाली आहेत.