भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:58 PM2024-05-22T19:58:26+5:302024-05-22T19:59:02+5:30
Lok Sabha Election Prediction: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील BJP ला स्पष्ट बहूमत मिळण्याची भविष्यवाणी केली आहे.
Lok Sabha Election Prediction : लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून, दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडी आपापले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. अशातच, अमेरिकेतील एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञाने लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठा दावा केला आहे.
अलीकडेच देशातील सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला बहूमत मिळण्याची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता रिस्क अँड रिसर्च कन्सल्टन्सी कंपनी युरेशिया ग्रुपचे संस्थापक आणि अमेरिकन निवडणूक तज्ञ आयन ब्रेमर यांनीदेखील भाजपला 2019 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 305 (+/-10) जागा मिळतील. म्हणजेच भाजपला जास्तीत जास्त 315 आणि कमीत कमी 295 जागा मिळू शकतात.
ते पुढे म्हणाले की, जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास फक्त भारताच्या सार्वत्रिक निवडणुका पूर्णपणे स्थिर दिसून येतात. इतर सर्व ठिकाणी, विशेषतः अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकाही समस्यांनी भरलेल्या दिसत आहेत. आम्ही व्यापक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चिततेचा सामना करत आहोत. जागतिक बाजारपेठेवर राजकारणाचा मोठा प्रभाव दिसून येतोय. राजकीयदृष्ट्या स्थिर वाटणारी एकमेव गोष्ट म्हणजे भारतातील निवडणुका.
प्रशांत किशोर यांचा अंदाज
दरम्यान, भारतीय निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरजचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप चमकदार कामगिरी करेल. गेल्या 2019 च्या निवडणुकांपेक्षा तेवढ्याच किंवा जास्त जागा भाजपला मिळतील. विशेषतः भाजप दक्षिण भारतात जोरदार मुसंडी मारेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.