पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा जेव्हा बहुमताने सत्तेत आले तेव्हा भाजपाचे काही दशकांपासून सोबत असलेले पक्ष साथ सोडून गेले होते. शिवसेना, अकाली दल हे सर्वात जुने मित्र होते. शिवसेनेने तीन वर्षांपूर्वी राज्यात निवडणूक झाल्यावर भाजपाची साथ सोडली, तर अकाली दलाने कृषी कायद्यांवरून साथ सोडली. परंतू आता अकाली दलाने पुढील लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत.
पंजाबमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यात दोन पक्षांना मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसची सत्ता गेली तर ज्या निवडणूकीवर डोळा ठेवून कृषी कायद्यांवरून राजकारण करण्यासाठी शिरोमणि अकाली दलाने केंद्रातील सत्ता सोडली त्यांचाही दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले आहे.
शिरोमणि अकाली दलाचे सेक्रेटरी जनरल सरदार बलविंदर सिंह भूंदड़ यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पुढची लोकसभा पुन्हा भाजपासोबत लढण्याचे संकेत दिले आहेत. जर काँग्रेसने कॅप्टनना हटविले नसते तर अशी वेळ आली नसती. परंतू आपला एवढे मतदान होणे ही आश्चर्याची बाब आहे. सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे लोकांना वाटले काहीतरी नवीन ट्राय करूया, यामुळे त्यांनी आपला निवडून दिल्याचे म्हटले.
कोणताही पक्ष आम्हाला संपवू शकत नाही. आमचा पक्ष गावागावात पोहोचलेला आहे. तीन महिन्यांनंतर आपला जनतेचा रोष सहन करावा लागणार आहे. भाजपानेही काही प्रगती केली नाही. जर आम्ही सोबत असतो तर काहीतरी फरक दिसला असता. २०२४ मध्ये आम्ही पुन्हा एकत्र लढण्याची शक्यता आहे, नक्की नाही. अजून कोणताही निर्णय झालेला नाही, यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल, असे भूंदड़ यांनी स्पष्ट केले.