राजस्थानच्या जोधपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपाच्या एका विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. माझ्याकडे देखील एक चांगली स्कीम असल्याचं त्यांनी सांगितलं. मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना देव आणि मुस्लिमांना अल्लाह भेटेल असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी म्हटलं आहे.
2014 आणि 2019 मध्ये दिलेली आश्वासनं भाजपाने पूर्ण केली नाहीत आणि आता 2024 मध्ये 2047 पर्यंत विकसित देश बनवू असं सांगत आहेत, असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी सांगितलं. सध्या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जोधपूरचे खासदार आहेत. त्यांनी येथून गेल्या निवडणुकीत अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने येथून करण सिंह उचियारडा यांना तिकीट दिलं आहे.
उचियारडा म्हणाले की, "2047 मध्ये शेखावत 80 वर्षांचे होतील आणि मोदीजी 100 वर्षांचे होतील. गजेंद्र सिंह शेखावत यांनी ठरवलं आहे की, जर याच आधारावर मत द्यायचं असेल तर माझ्याकडे खूप चांगली स्कीम आहे. ती हिंदूंसाठीही आहे आणि मुस्लिमांसाठीही आहे. मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बनवणार आहे. मी जाऊन असं काम करेन की तुम्हा सर्वांना भगवान श्रीराम आणि मुस्लिमांना अल्लाह भेटतील. प्रत्येकाला स्वतःचा देव मिळेल आणि तिथून परत येण्यासाठी मी एक जिनाही बनवेन."
"यासाठी 30 वर्षे लागतील, तोपर्यंत मला मतदान करावं लागेल. 30 वर्षानंतर माझं वय 80 वर्षांचं होईल आणि मग जेव्हा मी मत मागायला येईन तेव्हा एकतर माझ्या विकास योजनेवर विश्वास ठेवा किंवा सोन्याच्या जिन्यावर विश्वास ठेवा. हे लोक तुम्हाला मूर्ख बनवून तुमची मतं हिसकावून घेतील आणि देशाला संकटात टाकतील. आता कोणाला पाठिंबा द्यायचा याचा विचार तुम्हीच करा" असं देखील म्हटलं आहे. करण सिंह उचियारडा हे त्यांच्या जाहीर सभांमध्ये विद्यमान खासदारांच्या गेल्या 10 वर्षातील कामाबद्दल सातत्याने प्रश्न विचारत आहेत.