नवी दिल्ली - बीएसएफचे बरखास्त जवान आणि वारणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात समाजवादी पक्षाकडून लोकसभेसाठी उभे असलेले तेज बहादुर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यावर तेज बहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली होती.
तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, हा दावा दाखल करून घेण्याइतपत गुणात्मक दर्जेचा आढळत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. मोदींन विरोधात तगडा उमेदवार म्हणून समजल्या जाणाऱ्या तेज बहादूर यांना उमेदवारी मिळण्याची शेवटची संधी सुद्धा आता संपली आहे.
तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, १९ मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. तसेच उमेदवारी रद्द झाल्यानंतर आम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
वाराणसीमध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. तेज बहादूर यादव यांनी २९ एप्रिल रोजी समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.