'रेस' सिनेमातील 'तो' डायलॉग अन् देशात उसळलेली मोदी लाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 07:36 PM2019-05-24T19:36:57+5:302019-05-24T19:46:54+5:30
हा डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे.
'फिर एक बार... मोदी सरकार', 'अब की बार... तीन सौ पार', असा निर्धार करूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे 'राईट हँड' भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे लाखो कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. २०१४ मध्ये जसं वातावरण होतं, तसं यावेळी नव्हतं - किंबहुना ते दिसत नव्हतं असं आता म्हणावं लागेल. त्यामुळे स्वाभाविकच २०१९चा महासंग्राम त्यांच्यासाठी सोपा नव्हता. परंतु, त्यांनी दिलेले दोन्ही नारे खरे 'करून दाखवले' आणि 'मोदी हटाओ'चा विडाच उचललेल्या विरोधकांना अक्षरशः झोपवले. देशात 'मोदी त्सुनामी'च उसळली. या अतिविराट यशामागे काय कारणं आहेत, यावर तज्ज्ञ मंडळी विचारमंथन करत आहेत. एअर स्ट्राईक, हिंदूराष्ट्रवादाचा मुद्दा, प्रचारात विरोधकांना भरकटवण्याची खेळी इथपासून ते सक्षम पर्याय नसण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ही कारणमीमांसा करताना, 'रेस' सिनेमातील एक डायलॉग मोदींच्या यशाचं गमक सांगून जाणारा वाटतो.
सैफ अली खान आणि अक्षय खन्ना हे दोघं 'रेस' सिनेमात भाऊ असतात. मोठा भाऊ सैफचं यश अक्षयच्या डोळ्यात खुपत असतं, डोक्यात जात असतं. त्यामुळे तो त्याला हरवण्यासाठी बरीच कारस्थानं करत असतो. अक्षयवर जीव ओवाळून टाकणाऱ्या सैफला हे सगळं समजतं आणि मग तो त्याचाच डाव त्याच्यावर उलटवून 'रेस' जिंकतो, अशी सिनेमाची गोष्ट. या सिनेमात सैफचा एक डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे. आश्चर्य म्हणजे, हा डायलॉग लोकसभा निकालांना तंतोतंत लागू पडतो.
सैफ अली खान अक्षयला म्हणतो,
'तुम कभी जीत नही पाए क्यूं की तुम हमेशा मुझे हराने की सोचते थे, और मैं कभी हारा नहीं, क्यूं की मैं हमेशा जितने की सोचता था'
लोकसभा निवडणुकीच्या 'रेस'मध्येही हेच तर झालं. देशभरातील पाच-दहा नव्हे तर २०-२२ पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी मैदानात उतरले होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जेडीएस, डावे आणि अनेक. प्रत्येक जण प्रत्येक सभेमध्ये, चर्चांमध्ये एकच गोष्ट सांगत होता - मोदींना मत देऊ नका, त्यांना पराभूत करा, सत्तेतून खाली खेचा. महाराष्ट्रात तर, एकही जागा न लढवणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला काय आवाहन केलं होतं आठवा. मोदी आणि शहा या दोघांना राजकीय क्षितिजावरून कायमचं दूर करा, असं त्यांनी म्हटलं होतं. याउलट, नरेंद्र मोदी प्रत्येक प्रचारसभेत जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत होते. पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी, भाजपाच्या विजयासाठी मतांचा जोगवा मागत होते. तो मतदारांनी त्यांना दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं. पाच वर्षं त्यांनी चालवलेलं सरकार, त्यांची ध्येय-धोरणं, निर्णय, त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यांनी केलेला प्रचार किती योग्य, किती अयोग्य हा वादाचा विषय; पण जनादेश त्यांनी जिंकला आहे आणि लोकशाहीत त्याहून मोठं काहीच नाही.
सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019
Together we grow.
Together we prosper.
Together we will build a strong and inclusive India.
India wins yet again! #VijayiBharat
नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचारांमध्ये अधिक सामर्थ्य असतं, हे आपल्याला प्रत्येकालाच ठाऊक आहे. सैफ अली खानचा डायलॉग वेगळ्या शब्दांत तेच सांगतो. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनाही ते समजत होतं. पण, त्यांची थोडी गल्लत झाली. त्यांनी मोदींची गळाभेट घेणारे, प्रेम करणं ही संस्कृती असल्याचं म्हटलं. पण, 'आम्हाला जिंकवा' असं सांगण्याऐवजी 'त्यांना पाडा' यावरच त्यांचा भर होता. याउलट, जनतेची नस ओळखलेल्या मोदींनी बहुधा विजयाचं सूत्र अचूक हेरलं आणि 'लाटे'चं रूपांतर 'त्सुनामी'त केलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात, आता इथून पुढेही त्यांना हाच सकारात्मक विचार पुढे न्यावा लागेल, हे नक्की!
Thank you India! Watch from the BJP Headquarters. https://t.co/6WTN8almav
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019