नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत 44 उमेदवार निवडून आलेल्या काँग्रेसच्या कामगिरीत यंदा किंचित सुधारणा झाली. काँग्रेसनं अर्धशतक पार केलं. मात्र त्यांना यंदाही लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता नाही. 16 व्या लोकसभेतही काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हतं. यंदादेखील त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के सदस्य असल्यास एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं. लोकसभेत एकूण 543 सदस्य आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी पक्षाचे 55 खासदार असावे लागतात. मात्र काँग्रेसकडे 52 खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद थोडक्यात हुकण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद अनेकार्थांनी महत्त्वाचं असतं. लोकपाल, सीबीआय प्रमुख, मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य माहिती आयुक्त आणि एनएचआरसीचे अध्यक्ष यांची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्याचा सहभाग असतो. मल्लिकार्जुन खर्गे 16 व्या लोकसभेत काँग्रेसचे गटनेते होते. मात्र मोदी सरकारनं काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिलं नव्हतं. त्यामुळे लोकपाल नेमणुकीच्या बैठकीत सहभागी होण्यास खर्गेंनी नकार दिला होता. खर्गे यांना बैठकीत विरोधी पक्षनेते म्हणून नव्हे, तर विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यामुळेच खर्गेंनी या बैठकीस हजर राहण्यास नकार दिला. विरोधातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं, त्यासाठी नियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली होती.
फिर एक बार, काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद गमावणार?; द्यायचं की नाही मोदीच ठरवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 8:38 PM