नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात विराट जनादेश असलेले राष्ट्र प्रमुख ठरले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली एकट्या भाजपानं बहुमताचा टप्पा अगदी सहज ओलांडला. पाच वर्ष सत्तेत असूनही भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपा त्रिशतक गाठत असताना एनडीएनं साडे तीनशेच्या टप्पा ओलांडला. त्यामुळे आता जगाचा विचार केल्यास, मोदी हे सर्वात तगडा जनादेश पाठिशी असलेले राष्ट्र प्रमुख आहेत.लोकशाहीच्या माध्यमातून इतका दणदणीत विजय मिळवणारे मोदी हे जगातील सध्याचे एकमेव नेते आहेत. या विजयाबद्दल काल इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींचं अभिनंदन केलं. ते नुकतेच पाचव्यांदा निवडून आले. पण त्यांना ही निवडणूक अवघड गेली. ते आता काही छोट्या पक्षांच्या सोबतीनं सरकार चालवत आहेत. तर जपानमध्ये शिंझो अबे बहुमतातील सरकार चालवत असले, तरीही त्यांच्याकडे असणारं बहुमत अतिशय मर्यादित आहे. ऑस्ट्रेलियात स्कॉट मॉरिसन यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. पण त्यांच्यामागे मोदींइतकं बहुमत नाही. युरोपातील अनेक देशांच्या प्रमुखांची स्थितीही फारशी चांगली नाही. ब्रिटनच्या थेरेसा मे यांचं सरकार ब्रेक्झिटमुळे फारसं स्थिर नाही. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युल मॅक्रन आणि जर्मनीच्या अँजेला मर्केल यांच्या सरकारला असणारा जनमताचा पाठिंबा मर्यादित आहे. तुर्कस्थानात इर्दोगन आणि रशियात पुतीन अतिशय मजबूत स्थितीत असल्याचं वाटतं. मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे निसटतं बहुमत आहे.
मोदींचं यश शानदार! जगातलं सर्वात विराट जनादेशाचं सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 7:50 PM