पाटणा: लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या रमेश कुमार शर्मा यांचा पराभव झाला आहे. तब्बल 1107 कोटींची संपत्ती असलेल्या शर्मांनी संध्याकाळी सव्वा सातपर्यंत अवघी 1429 मतं मिळाली आहेत. ते पाटलीपुत्र मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात सध्या भाजपाचे राम क्रिपाल यादव आघाडीवर आहेत. तर राजदच्या मिसा भारती दुसऱ्या स्थानावर आहेत. 63 वर्षांच्या रमेश कुमार शर्मा बोटींचं रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीचे मालक आहेत. बोट हेच त्यांचं निवडणूक चिन्ह होतं. रमेश इंजिनीयर आहेत. ते स्वत:ला देशभक्त म्हणतात आणि भगत सिंग यांना आदर्श मानतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी टोपीवर निवडणूक चिन्हासोबत भगत सिंग यांचा फोटोदेखील छापला होता. आपल्याकडे 1107 कोटींची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केली होती. पाटलीपुत्रच्या नौबतपूरमधील कोपा कला गावात राहणाऱ्या रमेश कुमार यांचे वडील शिक्षक होते. रमेश यांनीदेखील शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र रमेश यांना बिहारमध्ये राहायचं नव्हतं. त्यामुळेच बिहारीमध्ये नोकरी मिळूनही त्यांनी ती स्वीकारली नाही. इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण करुन ते मर्चंट नेव्हीत काम करू लागले. सध्या ते 11 कंपन्यांचे मालक आहेत. त्यांच्या कंपन्यांचा व्याप परदेशांपर्यंत आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजकारणात चालत नाही फक्त 'मनी', निवडणुकीत आपटला १,१०७ कोटींचा धनी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 7:22 PM