लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:48 PM2019-05-23T22:48:28+5:302019-05-23T22:50:20+5:30
भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.
लखनौ - भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. एकीकडे सपा-बसपा महाआघाडीची ताकद आणि प्रियंका गांधी यांनी केलेला झंझावाती प्रचार यांचे आव्हान मोडीत काढत भाजपाने 61 जागांवर आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या बहुतांश उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गुरुवारी रात्री आलेल्या कलांनुसार भाजपा 61, महाआघाडी 18 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भाजपाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली होती. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कर होती. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
उत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले होते. मात्र अखेरीस उत्तर प्रदेशात मोदींचा करिश्मा चालला असून, भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, गोरखपूर, फूलपूर, गाझियाबाद, सुल्तानपूर, अमेठी, अलाहाबाद, अशा प्रमुख मतदारसंघांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे.