Top 5 candidates with lowest victory margin, Lok Sabha Election Result 2024: देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या काही महिन्यांपासून ४०० पारचा दावा केला होता. तो सपशेल फोल ठरल्याचे दिसून आले. भारताच्या जनतेने भाजपप्रणित एनडीएला २९२ जागा दिल्या. त्यापैकी भाजपाला २४० जागांसह भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. तर काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला. पण इंडिया आघाडीला मात्र अपेक्षेपेक्षा दणदणीत यश मिळवता आले. त्यांना २३२ जागा मिळवण्यात यश आले. अनेक ठिकाणी थोड्या फरकाने उमेदवार विजयी झाले. पाहू Top 5 'काँटे की टक्कर'
१. महाराष्ट्रात, एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात कमी फरकाने विजय मिळवला. त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून वायकर यांना ४,५२,६४४ मते मिळाली, तर कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली.
२. केरळमध्ये अटिंगल मतदारसंघात आणखी एक सर्वात कमी फरक दिसला. येथे काँग्रेसचा उमेदवार ६८४ मतांनी विजयी झाला. काँग्रेसचे उमेदवार अधिवक्ता अदूर प्रकाश यांना ३,२८,०५१ मते मिळाली. तर CPI(M) उमेदवार व्ही जॉय यांना ३,२७,३६७ मते मिळाली.
३. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या अजेंद्र लोधी यांनी हमीरपूर मतदारसंघात कमी म्हणजे २,६२९ मतांनी विजय मिळवला. लोधी यांना ४,९०,६८३ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार कुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल यांना ४,८८,०५४ मते मिळाली.
४. सर्वात कमी फरकाने विजय मिळण्यामध्ये यूपीमधील आणखी एक मतदारसंघ सलेमपूर आहे. तिथे सपा उमेदवार रमाशंकर राजभर यांनी भाजपाच्या रवींद्र कुशावाह यांच्यावर ३,५७३ मतांनी विजय मिळवला. राजभर यांना ४,०५,४७२ मते मिळाली, तर कुशावाह यांना ४,०१,८९९ मते मिळाली.
५. महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा ३,८३१ मतांनी विजय झाला. शोभा बच्छाव यांना ५,८३,८६६ इतकी मते मिळाली. तर भाजपाच्या सुभाष भामरे यांना ५,८०,०३५ मते मिळाली.