Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:45 AM2024-06-05T06:45:13+5:302024-06-05T06:57:55+5:30
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दहा वर्षांतील केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विरोधी आघाडी इंडियाने भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच संविधानाची प्रत प्रत्येक भाषणादरम्यान हातात ठेवली आणि त्यांनी नरेंद्र मोदी संविधान बदलण्यासाठी ४०० जागा मागत असल्याचा दावा केला होता. त्याचा परिणाम निकालावर झाला आहे. जनतेने, विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान आणि कर्नाटकातील मागासवर्गीय समाजातील लोकांनी राहुल गांधींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
संविधानाच्या मुद्द्यावर ठाम राहिले
मोदी सरकार आणि गौतम अदानी यांना सतत प्रश्न विचारणे, एका मानहानीच्या प्रकरणात खासदारकी जाणे, सरकारी बंगला काढून घेणे, शेवटी वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून यांच्या सांगण्यावरून रायबरेलीतून निवडणूक लढविली. युट्युब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते तरुणांपर्यंत पोहोचले. असे असले तरीही ते जातनिहाय जनगणना आणि संविधानाच्या मुद्द्याला ते धरून राहिले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या जागा वाढल्यामध्ये दिसून येते. १० मार्च रोजी राहुल गांधी यांनी भाजप खासदार अनंत हेगडे यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर टीका करत संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० जागांची गरज आहे, असे उत्तर दिले होते. त्या दिवसापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत ते या मुद्द्यावर कायम राहिले. धर्माला जात पुरून उरू शकते, हे त्यांना २०१९ च्या पराभवानंतर लक्षात आले होते. त्यामुळे संविधानाच्या मुद्द्यावर ठाम राहिले.
२०१९ च्या पराभवानंतर राहुल गांधी शिकले की...
२०१९ मध्ये झालेल्या पराभवानंतर लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, असे राहुल गांधी यांना जाणवले होते. त्यानंतर २०२२ सप्टेंबरमध्ये राहुल गांधी यांनी भाजपने केलेली पप्पू नावाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला.
यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी दररोज २५ किलोमीटर पायी चालत होते. पाच महिन्यात राहुल गांधी ३७०० किलोमीटर पायी चालले.
या यात्रेत त्यांनी आपल्या घरात, नंतर पक्षात आणि शेवटी जनतेमध्ये आपली प्रतिमा एक भक्कम आणि गंभीर नेता अशी तयार केली.