- राजेंद्र कुमारलखनौ : '४०० पार'चा नारा देत देशातील सर्वाधिक ८० लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपचे बडे नेते मोदी-योगी यांची जादू चालली नाही. उत्तर प्रदेशातील राजकुमार असा भाजपच्या नेत्यांनी उल्लेख केलेल्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय रथ रोखला. त्यामुळे उत्तर प्रदेशात सर्व ८० जागा जिंकण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला केवळ ३६ जागा मिळाल्या आहेत, तर सपा आणि काँग्रेसने ४३ जागांवर मजल मारली आहे. यामध्ये सपा ३७ जागांवर, तर काँग्रेस ७ जागांवर जिंकली आहे. येथे मायावतींच्या बसपा पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
मोदी-योगी जादू चालली असती तर विरोधकांना एवढे यश मिळाले नसते. एकूणच या निवडणुकीच्या निकालाने यूपीतील मोदी-योगी जोडीला मोठा धक्का बसला आहे. यूपीमध्ये अखिलेश-राहुल जोडीला हलक्यात घेण्याचा आणि जनतेप्रती उदासीनता दाखविणाऱ्या सर्व खासदारांना मैदानात उतरवण्याचा अतिआत्मविश्वास भाजपला महागात पडल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अखिलेश आणि राहुल यांनी ज्या प्रकारे पीडीए (मागास आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक जागेवर उमेदवार उभे केले, त्यामुळे त्यांना भाजपवर दबाव आणण्याची संधी मिळाली. जनतेनेही महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधक का जिंकले?- यावेळी अखिलेश आणि राहुल यांनी मागासवर्गीय कार्डावर डाव खेळला. पीडीएचा फॉर्म्युला, जात जनगणना, आरक्षण आणि संविधान, बेरोजगारी हे मुद्दे मांडण्यात आले. हा डाव यशस्वी झाला.- यावेळी काँग्रेस आणि सपाने मुस्लिम मते मिळवण्यासाठी अत्यंत संयमाने काम केले. मुस्लिम उमेदवारांना तिकीट देताना खबरदारी घेण्यात आली. या पक्षांच्या मुस्लिम उमेदवारांनीही प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापासून स्वतःला दूर ठेवले. त्याचा फायदा असा झाला की, बसपाने २२ मुस्लिम उमेदवार उभे केल्यानंतरही मुस्लिम मतांचे विभाजन झाले नाही.- काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी एकत्र प्रचार केला. प्रचारापासून ते मतदानापर्यंत त्यांनी स्थापन केलेल्या समन्वय समित्यांमध्ये जम बसवला. आप आणि डावे पक्षही एकत्र आले. त्याचा परिणाम झाला आणि इंडिया आघाडीची मते विभागली गेली नाहीत.- उत्तर प्रदेशात भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास होण्याचे एक कारण म्हणजे भाजपच्या उमेदवारांबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी.
या विजयाने काय होईल?- आता यूपीचे राजकारण बदलणार आहे.- काँग्रेस आणि सपा मिळून आता भाजपच्या धोरणांना धारेवर धरतील.- महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर राजकारण होणार आहे.- भाजप सरकारने संस्थांवर निर्माण केलेला दबाव विरोधकांमुळे कमकुवत होणार आहे.- गरीब, शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर योगी सरकारला कोंडीत पकडणे सुरू होईल.