Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात जेलमध्ये आहेत. निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन कालावधी संपल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेलमध्ये सरेंडर करावं लागलं आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना केजरीवालांची निकालावर नजर आहे. अरविंद केजरीवाल हे जेलमधून मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जेलमधून मतमोजणीवर लक्ष ठेवून आहेत. ते टीव्हीवरून मतमोजणीबाबत क्षणोक्षणीचे अपडेट्स घेत आहेत. यावेळी केजरीवाल यांना दिल्लीत तसेच देशात विरोधी आघाडीची कामगिरी चांगली होण्याची आशा आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा करताना केजरीवाल म्हणाले होते की, आघाडी 295 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करणार आहे.
आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले होते की, जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मला जेलमध्ये जावं लागणार नाही. जामिनाची मुदत वाढवण्यासाठी केजरीवाल यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. आता निकालाची वेळ आली आहे. देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.
दारू घोटाळ्यात केजरीवाल यांच्या अटकेच्या आधारावर आम आदमी पार्टीने 'केजरीवाल को जेल का जवाब वोट से' ही मोहीम सुरू केली होती. ही पूर्ण प्रचार अभियानाची थीम होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील आपल्या अटकेच्या मुद्द्यावरून भाजपा आणि एनडीए सरकारला कोंडीत पकडताना दिसले.
आम आदमी पार्टी दिल्ली, हरियाणा, चंदीगड, गोवा आणि गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीतील सातपैकी चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पार्टी हरियाणातील एका जागेवर आणि गुजरातमध्ये दोन जागांवर युतीत निवडणूक लढवत आहे, तर पंजाबमध्ये पक्ष एकट्यानेच लढत आहे.