मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधून भाजपाने बंपर जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करण्यात यश मिळालं होतं. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात जबर धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला यावेळी ८० पैकी केवळ ३३ जागांवर विजय मिळवला आहे. सपा आणि काँग्रेसच्या आघाडीने उत्तर प्रदेशात अनपेक्षिकपणे जोरदार मुसंडी मारली. तर उत्तर प्रदेशातील चौथा मोठा पक्ष असलेल्या मायावतींच्या बसपाला एकही जागा मिळू शकली नाही. मात्र बसपाने घडवून आणलेल्या मतविभाजनामुळे भाजपावरील मोठी नामुष्की टळली आहे. अन्यथा उत्तर प्रदेशात भाजपाची अवस्था आणखीनच बिकट झाली. असती.
उत्तर प्रदेशात यावेळी १६ लोकसभा मतदारसंघ असे होते, जिथे मायावतींच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही जय पराजयाच्या मतांपेक्षा अधिक अधिक आहेत. त्यामुळे १६ मतदारसंघात मायावती यांनी आपल्या विरोधकांचं नुकसान केलं आहे. आता हे नुकसान कुणाचं केलं, याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. आता आकडेवारी पाहायची झाल्यास निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार जिथे मायावतीच्या उमेदवारांना जय पराजयापेक्षा अधिक मत मिळाली आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी भाजपाचा विजय झाला आहे. तर २ ठिकाणी आरएलडी आणि अपना दल (सोनेलाल) यांचा विजय झाला आहे.
त्यामुळे आता या जागा इंडिया आघाडीला मिळाल्या असत्या तर काय झालं असतं, याचा अंदाज घ्यायचा झाल्यास भाजपाच्या जागा ३३ वरून १९ जागांपर्यंत खाली आल्या असत्या. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांच्यात आघाडी झाली होती. त्यावेळी भाजपाच्या जागगा ७१ वरून घटून ६२ पर्यंत खाली आल्या होत्या.
दरम्यान, प्रचारावेळी मायावतींची भूमिका ही भाजपाविरोधात आक्रमक नसल्याचे इंडिया आघाडीचे नेते बसपाच्या मतदारांना पटवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे बसपाचा मतदार इंडिया आघाडीकडे वळला. दरम्यान, ज्या मतदारसंघात मायाववतींच्या पक्षाला जय पराजयापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत, अशा ठिकाणी भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना फायदा झाला. ज्या जागांवर बसपाने घेतलेल्या मोठ्या प्रमाणावरील मतांमुळे भाजपा आणि मित्रपक्षांचा विजय झाला आहे, अशा जागांमध्ये अकबरपूर, अलीगड, अमरोहा, बांसगाव, भदोही, बिजनौर, देवरिया, फर्रुखाबाद, फतेहपूर सिक्री, हरदोई, मेरठ, मिर्झापूर, मिसरिख, फूलपूर, शाहजहाँपूर आणि उन्नाव या जागांचा समावेश आहे.