नवी दिल्ली : देशाच्या जनतेने लाेकसभा निवडणुकीत कशा पद्धतीचा काैल दिला, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत तरुणाईचा पुढाकार वाखाणण्याजाेगा हाेता.
तरुणाईने प्रचारात उत्साहान भाग घेतला. त्यावरच न थांबता निवडणुकीच्या मैदानातही उतरले. यापैकी २५ वर्षांचे चार तरुण उमेदवार लाेकसभेत जाणार असून, त्यात तीन महिला खासदार आहेत. विशेष म्हणजे हे चौघेही बिहार, राजस्थान आणि यूपी अशा राज्यांमधील आहेत.
शांभवी चाैधरीशांभवी चाैधरी या बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अशाेक चाैधरी यांच्या कन्या आहेत. २५ वर्षीय शांभवी यांनी समस्तीपूर मतदारसंघात काँग्रेसचे सनी हजारी यांना माेठ्या फरकाने पराभूत केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी एका प्रचारसभेत शांभवी यांचे काैतुक केले हाेते. त्या एनडीएच्या सर्वांत तरुण उमेदवार हाेत्या.
संजना जाटवराजस्थानच्या भरतपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या २५ वर्षीय संजना जाटव यांनी लाेकसभा निवडणूक लढविली. त्यांनी भाजपच्या रामस्वरूप काेळी यांचा ५१ हजार मतांनी पराभव केला. त्यांनी २०२३ ची विधानसभा निवडणूकही लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा भाजपचे रमेश खेडी यांनी केवळ ४०९ मतांनी पराभव केला हाेता.
पुष्पेंद्र सराेजपुष्पेंद्र सराेज हे पाच वेळचे आमदार व उत्तर प्रदेशचे माजी मंत्री इंद्रजित सराेप यांचे पुत्र आहेत. समाजवादीच्या तिकिटावर पुष्पेंद्र यांनी काैशंबी येथून निवडणूक लढविली. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार विनाेद कुमार साेनकर यांचा १ लाख मतांनी पराभव केला. पुष्पेंद्र हे उच्चशिक्षित असून, परदेशातून त्यांनी अकाउंटिंगचे शिक्षण घेतले आहे.
प्रिया सराेजउत्तर प्रदेशच्या मछलीशहर मतदारसंघातून प्रिया सराेज यांनी ३५ हजार मतांनी विजय मिळविला. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार भाेलानाथ सराेज यांच्याशी हाेता. भाेलानाथ यांचा पराभव करून प्रिया सराेज यांनी भाजपला माेठा धक्का दिला आहे. प्रिया या तीन वेळचे खासदार तुफानी सराेज यांच्या कन्या आहेत.