लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. तसेच आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून भाजपा आणि एनडीएला मोठा धक्का बसताना दिसत आहे. जवळपास २४२ जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून, राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्येही भाजपाचं नुकसान झालं आहे. मात्र या पडझडीतही काही राज्यांमधून पैकीच्या पैकी जागा भाजपाच्या खात्यात जाताना दिसत आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी जागांवर आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाने २९ पैकी २९ जागांवर आघाडी घेतली आहे. मागच्या वेळी काँग्रेसने जिंकलेली एकमेव जागा असलेल्या छिंडवाडा येथेही भाजपाच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे छिंदवाडामधून पिछाडीवर पडले आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे चर्चेत असलेल्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीला सहानुभूती मिळू शकली नाही. दिल्लीतील सात पैकी ७ जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने ४ पैकी ४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर उत्तराखंडमध्येही भाजपाने ५ पैकी ५ जागांवर आघाडी घेतली आहे.