चंदीगड : लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसचाच बोलबाला राहिला आहे. येथील १३ जागांपैकी ७ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे.
सत्ताधारी ‘आप’नेही ३ जागांवर विजय मिळविला आहे. तर शिरोमणी अकाली दलाला १ आणि दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. मागच्या वेळी दोन जागा जिंकलेल्या भाजपचा मात्र या राज्यातून सुपडा साफ झाला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपने शिरोमणी अकाली दलासोबत लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिरोमणी अकाली दलाला २ आणि भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत सर्व जागांवर उमेदवार उभे केले. मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
जालंधरमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, फतेहगढसाहीबमध्ये काँग्रेसचे अमरसिंह, अमृतसरमध्ये गुरुजीत औजाला, चंदीगडमध्ये मनीष तिवारी, पटियालामध्ये डॉ. धर्मवीर गांधी यांनी विजय मिळविला.
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा जिंकलापंजाबमध्ये केवळ अमृतपाल सिंगच नाही तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग यानेही निवडणूक जिंकली आहे. फरीदकोट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सरबजीत सिंग खालसा यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार करमजीत अनमोल यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.