Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:36 AM2024-06-04T06:36:49+5:302024-06-04T06:49:32+5:30

Lok Sabha Election Result 2024 Live: कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Lok Sabha Election Result 2024 Live : NDA or India? The result of the Lok Sabha elections in the world's largest democracy today | Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

Lok Sabha Election Result 2024 : एनडीए की इंडिया? जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीचा आज निकाल

नवी दिल्ली : सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उद्या उत्तर मिळेल.

एनडीए लोकसभेच्या ४००हून अधिक जागा जिंकणार, असा दावा भाजपने केला आहे, तर ‘एनडीए’ला सत्तेवरून दूर करून केंद्रात आम्हीच सरकार स्थापन करणार, असे ‘इंडिया’ सांगत आहे. कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल पडणार असून कोण विजयाचा गुलाल उधळणार हे आज स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकांची मतमोजणी होऊन  निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया समाप्त होणार आहे. यंदाच्या निवडणुकांत भाजपप्रणीत एनडीए आघाडीच विजयी होणार, असा निष्कर्ष बहुतांश ‘एक्झिट पोल’मधून काढण्यात आला आहे; मात्र एनडीए लोकसभेच्या ४००हून अधिक जागा जिंकेल, हा दावा एक्झिट पोलपैकी बहुतांश एक्झिट पोलनी मान्य केलेला नाही. एनडीएला ३५०हून अधिक जागा मिळतील, या मताकडे एक्झिट पोलचा कल आहे. 

विविध एजन्सींकडून एक्झिट पोल तयार केले जातात. त्याद्वारे भाजपला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत इंडिया आघाडीने या पोलचे निष्कर्ष नाकारले आहे. इंडिया आघाडीला १४१ ते १६१च्या दरम्यान जागा मिळतील, असे या पोलमध्ये म्हटले होते. 

पंतप्रधानांनीही केला झंझावाती प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेतल्या. त्यांनी झंझावाती निवडणूक प्रचार केला. इंडिया आघाडीतील घटक पक्ष देशात फुटीचे राजकारण करीत आहेत. ही तुकडे-तुकडे गँग आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

राहुल गांधी यांनी केले जोरदार प्रयत्न
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात प्रचारसभा घेऊन भाजप व एनडीएवर कडाडून टीका केली. निवडणुकांत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीला यश मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न केले. सत्तेत आल्यास आम्ही काय करणार यावर त्यांनी भर दिला.

आयोगाबद्दल प्रश्न
विरोधकांनी निवडणूक प्रक्रिया, तसेच आयोगाच्या कार्यपद्धतीवर  प्रश्न विचारले. सत्ताधाऱ्यांबाबत आयोगाने पक्षपाती भूमिका घेतल्याची टीका ‘इंडिया’ने केली होती. हा आयोगाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला. 

आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेचाही निकाल
लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या चार राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. आंध्र प्रदेश, ओडिशा येथील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या, मंगळवारी होणार असून, निकालही घोषित होतील.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 Live : NDA or India? The result of the Lok Sabha elections in the world's largest democracy today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.