मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:06 PM2024-06-04T13:06:48+5:302024-06-04T13:07:56+5:30
Lok Sabha Election Result 2024 : आजच्या निकालानंतर एक्झिट पोलसह सर्व तज्ज्ञांचे दावेही फोल ठरले आहेत.
Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या आकडेवारीवरुन हे निश्चित आहे की, देशात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होईल, मात्र पंतप्रधान मोदींचा 400 पारचा नारा सपशेळ फेल ठरला आहे. भाजपसाठी परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, ते एकट्याने बहुमताचा आकडा पार करू शकत नाहीत आणि संपूर्ण एनडीएला एकत्रितपणे 300 चा आकडा पार करण्यात अपयशी होताना दिसत आहे. याचा अर्थ एक्झिट पोलसह सर्व तज्ज्ञांचे दावे फोल ठरले आहेत.
भाजपची सध्या स्थिती
निवडणूक आयोगाने दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर केलेल्या ट्रेंडनुसार, भाजप 241 जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ भाजप कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याच्या स्थितीत नाही. तर एनडीएबद्दल बोलायचे झाले तर ते जवळपास 285 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या 52 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने जोरदार पुनरागमन केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकट्याने 95 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी एकत्रितपणे 250 जागांच्या आसपास आहे. म्हणजेच, सर्व एक्झिट पोल आणि तज्ज्ञांचे दावे खोटे ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एबीपी न्यूज सी व्होटरचा एक्झिट पोल
एबीपी न्यूज सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला देशभरातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 353-383 जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. तर इंडिया आघाडीला 152-182 जागा दाखवण्यात आल्या होत्या.
जन की बात एक्झिट पोल
जन की बात एक्झिट पोलमध्ये एनडीएला 362-392 जागा मिळतील, तर भारतीय आघाडीला 141-161 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला होता.
रिपब्लिक भारत मॅट्रीसचा एक्झिट पोल
रिपब्लिक भारत मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353-368 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. या एक्झिट पोलने इंडिया अलायन्सला 118-133 जागा आणि इतरांना 43-48 जागा दिल्या होत्या.
रिपब्लिक टीव्ही पी मार्क
रिपब्लिक टीव्ही पी मार्कच्या पोलनुसार, एनडीएला देशभरात 359 जागा मिळतील, तर इंडिया आघाडी 154 आणि इतरांना 30 जागा देण्यात आल्या होत्या.
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
इंडिया न्यूज डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार त्यांनी लोकसभेच्या 371 जागा एनडीएकडे जातील असे म्हटले होते. तर, इंडिया अलायन्स 125 जागांवर राहिल, असा दावा केला होता.
इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडिया
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 361-401 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 131-166 जागा आणि इतरांना 8-20 जागा मिळाल्याचे दाखवण्यात आले होते.
या एक्झिट पोलने 400 पार केल्याचा दावा केला होता
यावेळी भाजप 400 हून अधिकचा नारा देत लोकसभा निवडणूक लढवत होता. अशा परिस्थितीत न्यूज 24 टुडेज चाणक्य हा एकमेव एक्झिट पोल होता, ज्याने एनडीएला 400 जागा दिल्या होत्या. चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये इंडिया अलायन्सला 107 जागा आणि इतरांना 36 जागा देण्यात आल्या होत्या.
ट्रेंडच्या जवळ फक्त एक एक्झिट पोल
दैनिक भास्कर हा एकमेव एक्झिट पोल आहे, जो ट्रेंडच्या अगदी जवळचा वाटतो. यामध्ये एनडीएला 281-350 जागा मिळण्याचा अंदाज होता, तर इंडिया अलायन्सला 145-201 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला होता.