२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून NDA आघाडी २९३ जागांसह केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. हे आकडे एक्झिट पोलचे निकाल आणि निवडणूक विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच वेगळे आहेत. यावर इंडिया टुडेने राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली.
प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या जागा कमी होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. तसेच निवडणूक निकालांबाबतचं त्यांचं भाकीतही चुकीचं ठरल्याचं त्यांनी मान्य केलं. यावेळी त्यांनी भाजपाच्या '४०० पार' या नाऱ्याचा देखील उल्लेख केला.
भाजपाच्या जागा कमी होण्यामागील कारणं सांगताना प्रशांत किशोर म्हणाले की, "'४०० पार'चा हा नारा कोणी लिहिला, या नाऱ्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण हा अपूर्ण नारा आहे. '४०० पार' आहे पण कशासाठी? त्यांनी ते असंच सोडून दिलं. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे 'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' असा नारा दिला होता. कारण मोदी सरकार का हवंय तर महागाई आहे हा उद्देश स्पष्ट होता."
"४०० पार या नाऱ्यामुळे जास्त नुकसान"
"यावेळी तुम्ही ४०० पार असं म्हटलं, समाजाने हे अहंकार म्हणून घेतलं आणि विरोधकांनी हे संविधान बदलतील असं सांगितलं. ज्यांनी कोणी पक्षासाठी हा नारा लिहिला त्यांनी ४०० पार का? हेच सांगितलं नाही. ४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचं सर्वत्र नुकसान झालं आहे."
"खासदारांवर नाराज होते कार्यकर्ते"
"भाजपाची सर्वात कमकुवत गोष्ट म्हणजे मोदींवर जास्त अवलंबून राहणं. कार्यकर्ता म्हणाला, ४०० जागा येत आहेत, त्यांना (खासदार) धडा शिकवायचा आहे. तुम्ही माझ्या क्षेत्र आरा, आर के सिंह यांचं उदाहरण घेऊ शकता. तुम्ही कोणालाही विचारा लोक म्हणतात की, चांगलं काम केलं, चांगले मंत्री राहिले पण कार्यकर्ते नाराज होते कारण ते त्यांना भाव द्यायचे नाही."
वाराणसीचं दिलं उदाहरण
"आपण नक्कीच जिंकतोय, असं भाजपा समर्थकांना वाटत होतं. काही उद्देश नव्हता कारण ४०० पार होत होतं. याउलट जे भाजपा आणि मोदींच्या विरोधात होते, त्यांच्याकडे आपण यांना कोणत्याही मार्गाने रोखलेच पाहिजे, असं उद्दिष्ट होतं. मी तुम्हाला वाराणसीचं उदाहरण देतो. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या स्वतःच्या जागेवरील मतांची टक्केवारी केवळ २ टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे मताधिक्य २०.९ वरून ४१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने फरक लक्षणीयरीत्या खाली आला" असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.