Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून मोठ्या आघाडीसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विजयाकडे वाटचाल करत आहेत. निवडणूक निकालापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांनी या जागेवर आपला पराभव स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, राहुल गांधी १ लाख ७० हजार मतांनी (दुपारी १२.४० वाजता) आघाडीवर आहेत. मतमोजणीनंतर आतापर्यंत राहुल गांधींना सुमारे ३ लाख ५ हजार मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश प्रताप सिंह यांना १ लाख ३५ हजार मतं मिळाली आहेत.
बहुजन समाज पक्षाचे ठाकूर प्रसाद यादव यांनीही या जागेवर निवडणूक लढवली. यादव ९ हजार ५७९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेस कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. या जागेचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सातत्याने केलं आहे. यावेळी निवडणुकीपूर्वी त्या राज्यसभेवर गेल्या आणि राहुल गांधींसाठी ही जागा सोडली. अमेठीतून निवडणूक न लढवल्यामुळे भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींवर निशाणा साधला होता.
भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. "कर्तव्याचा जो मार्ग मिळाला... रायबरेलीतील देवासारख्या लोकांची नम्रतेने मी कठोर परिश्रम करून सेवा केली. तरीही माझ्या सेवेदरम्यान माझ्या विचारात, शब्दात किंवा कृतीत काही चूक झाली असेल किंवा कुणाला त्रास झाला असेल तर मी रायबरेलीच्या जनतेची माफी मागतो."
"मी माझ्या सर्व हितचिंतकांचे आणि पक्षाच्या सदस्यांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी अथक परिश्रम घेतले आणि निवडणुका अतिशय चांगल्या प्रकारे लढल्या, परंतु निर्णय आमच्या हातात नव्हता. जनता ही देवाचं रुप असते, त्यांचा जो काही आदेश असेल तो नेहमीच मान्य असेल. रायबरेलीतील लोकांनो अजूनही विश्वास ठेवा. हा रायबरेलीतील, तुमच्या कुटुंबातील भाऊ तुमच्या सुख-दु:खात सदैव तुमच्यासोबत असेल" असं दिनेश प्रताप सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.