Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. तर विरोधी आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ने जबरदस्त मुसंडी घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या निकालात एनडीए २९६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. यात भाजप जवळपास २४४ जागांवर आहे. तर I.N.D.I.A. २२९ जागांवर आघाडीवर दिसत आहे. यात काँग्रेसच्या ९८ जागा आहेत.
भाजपने निवडणूक प्रचारात या मुद्द्यांवर दिला होता भर, पण...या निवडणुकीत भाजपने ४००+ चा नारा दिला होता. याशिवाय, कलम ३७०, तीन तलाक, सीएए, राम मंदिर, यूसीए आदी मुद्द्यांवर भर दिला होता. मात्र प्रत्यक्षात हे मुद्दे आणि पीएम आवास यांसारख्या अनेक योजनाही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० पार पोहोचू शकले नाही. नव्हे, एकट्या भाजपला बहुमतापर्यंत आणि एनडीएला ३०० पार पोहोचवतानाही दिसत नाही.
‘या’ ६ राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका - भाजपला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राज्यांपैकी ही सहा राज्ये आहेत. केवळ या सहा राज्यांतच लोकसभेच्या एकूण २६३ जागा आहेत. यांपैकी २०१९ मध्ये एकट्या भाजपने तब्बल १६९ जागा जिंकल्या होत्या.
यावेळी, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात महत्वाच्या ठकरणाऱ्या उत्तर प्रदेशात ८० जागांपैकी केवळ ३१ जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. तर समाजवादी पक्षाला ३८ तर काँग्रेसला ७ जागां मिळताना दिसत आहेत. खरे तर उत्तर प्रदेशात भाजपला राम मंदिराचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. याशिवाय, भाजप महाराष्ट्रात - ११, पश्चिम बंगालमध्ये - १२, बिहारमध्ये - १२, कर्नाटकात - १७, आणि राजस्थानात - १४ जागांवर आघाडीवर आहेत अथवा अशा साधारणपणे केवळ ९७ जिंकताना दिसत आहे. अर्थात २०१९ च्या तुलनेत तब्बल ७२ जागा कमी...
या ६ राज्यांत २०१९ मध्ये अशी होती भाजपची स्थिती - लोकसभा निवडणूक २०१९ चा विचार करता, तेव्हा भाजपला उत्तर प्रदेशात - ६२, महाराष्ट्रात - २३, पश्चिम बंगालमध्ये - १८, बिहारमध्ये - १७, कर्नाटक - २५ तर राजस्थानात - २४ अशा एकूण १६९ जागा जिंकल्या होत्या.