Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची लढत ही उत्तर प्रदेशातील अमेठी जागेवर होती, जिथे यावेळी गांधी कुटुंबाच्या पारंपारिक जागेवर काँग्रेसचे नेते किशोरी लाल यांनी निवडणूक लढवली. गेल्या वेळी या जागेवर राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना भाजपाने पुन्हा एकदा तिकीट दिलं होतं.
स्मृती इराणी यांना यावेळी काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. स्मृती इराणी यांच्या विरोधात किशोरी लाल यांनी १ लाख ६५ हजार ९२६ मतांची आघाडी घेतली आहे. हे निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
"जनतेसाठी काम करणार"
"आज निवडणूक जिंकलेल्यांचे अभिनंदन. मला आशा आहे की, ज्याप्रमाणे आपण लोकांच्या समस्या ऐकल्या आहेत, त्याच पद्धतीने ते लोकांसाठी काम करतील. मी पंतप्रधान नरेंद्र आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानते. सर्व भाजपा कार्यकर्त्यांना धन्यवाद. अमेठीच्या जनतेचे आभार कारण त्यांनी मला पाच वर्षे सेवा करण्याची संधी दिली आहे."
"मला वाटतं की आजचा दिवस जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, जिंकलेल्यांचे अभिनंदन करण्याचा दिवस आहे. संघटना विश्लेषण करेल. एक लोकप्रतिनिधी या नात्याने हे माझं भाग्य होतं. मी प्रत्येक गावात जाऊन विजय-पराजयाची पर्वा न करता काम केलं आणि हा माझ्या आयुष्यातील मोठं सौभाग्य आहे" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.