भाजपाला बहुमताची हुलकावणी, सत्ता स्थापन करण्यासाठी लागेल मित्रपक्षांचा आधार, असं आहे पक्षीय बलाबल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:03 PM2024-06-04T18:03:35+5:302024-06-04T18:47:11+5:30

Lok Sabha Election Result 2024: दिवसभर चाललेल्या मतमोजणीनंतर अठराव्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं आहे. अब की बार ४०० पार असा नारा देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) मतदारांनी मोठा धक्का दिला असून, भाजपाला बहुमताने हुलकावणी दिली आहे.

Lok Sabha Election Result 2024: The strength of the party is that BJP will need the support of allies to establish power  | भाजपाला बहुमताची हुलकावणी, सत्ता स्थापन करण्यासाठी लागेल मित्रपक्षांचा आधार, असं आहे पक्षीय बलाबल 

भाजपाला बहुमताची हुलकावणी, सत्ता स्थापन करण्यासाठी लागेल मित्रपक्षांचा आधार, असं आहे पक्षीय बलाबल 

दिवसभर चाललेल्या मतमोजणीनंतर अठराव्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं आहे. अब की बार ४०० पार असा नारा देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मतदारांनी मोठा धक्का दिला असून, भाजपाला बहुमताने हुलकावणी दिली आहे. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाला २४१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सुमारे २९५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनेही जोरदार मुसंडी मारली आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून २३० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांत स्वबळावर बहुमत मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजपा आणि एनडीए पीछाडीवर पडत गेली. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी अनपेक्षित मुसंडी मारली. भाजपाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये भाजपाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपा २७२ या बहुमताच्या आकड्याखाली घसरला. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला.

दुसरीकडे काँग्रेसने राजस्थान, महाराष्ट्र,  उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, हरियाणा आदी राज्यांमध्ये बऱ्यापैकी यश मिळवलं. आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसने ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने ३५ हून अधिक जागांवर विजय मिळवला. त्याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने २९ आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाने २१ जागा मिळवून मोठं यश मिळवलं.

भाजपा २४१ जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र आता भाजपाला नवं सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच नवं सरकार स्थापन करण्यामध्ये एनडीएमधील जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशमधील तेलुगू देसम पक्षांची साथ भाजपाला महत्वाची ठरणार आहे. 

Web Title: Lok Sabha Election Result 2024: The strength of the party is that BJP will need the support of allies to establish power 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.