लोकसभेच्या निकालाने भाजपला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. यामुळे एनडीएतील घटकपक्षांच्या जिवावर सत्ता स्थापन करावी लागणार आहे. आजवर घटक पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या भाजपला आता याच पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. यातच वेळोवेळी पलटी मारणारे नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्या विश्वासावर भाजपाला सत्ता स्थापन करावी लागणार आहे. अशातच हे दोघे कोणासोबत राहतील. राहिलेच तर पाच वर्षे सरकार चालवू देतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच बिहारमधून महत्वाची महिती येत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या दोन्ही गटांनी आपापल्या सहकारी पक्षांना सरकार स्थापनेच्या मोर्चेबांधणीसाठी बोलविले आहे. याच नितीशकुमार यांना दोन्ही गटांनी संपर्क साधला आहे. आता नितीश कुमार हे अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने ते चांगली ऑफर ज्याची असेल त्याच्याकडे उडी मारण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार यांच्या पाठीमागील जागेवर तेजस्वी बसलेले आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. यावरून काही खेळ रंगणार नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
मोदी फॅक्टर संपला आहे. आम्ही इंडी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत, असे पाटणा विमानतळावरून निघण्यापूर्वी तेजस्वी यादव म्हणाले. यावेळी पत्रकारांनी या फ्लाइटने नितीश कुमारही दिल्लीला जाणार आहेत का, असे विचारले असता त्यांनी हसत मला माहित नाही, असे उत्तर दिले होते.
दिल्लीत कोण कोण येतेय...दरम्यान, मोदी सरकार-2 च्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीनंतर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 12.15 वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज एनडीए-इंडियाची बैठकही होणार आहे. त्यासाठी दोन्ही आघाडीचे नेते दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातून एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार गैरहजर राहणार आहेत. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू सकाळी 11 वाजता विजयवाडा येथून दिल्लीला रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद गट) नेत्या सुप्रिया सुळे आज शरद पवार यांच्यासोबत दिल्लीला पोहोचणार आहेत.