Lok sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपला जनतेने नाकारले असून, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले. तसेच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. जिथे सपाचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे अखिलेश यांनी सांगितले असल्याचे ममता यांनी नमूद केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदी-शाह यांनी एवढे हल्ले केले, एवढा पैसा ओतला तरीदेखील त्यांच्या अहंकारामुळे इंडिया आघाडीचा विजय झाला. मोदींचा पराभव झाला असून, अयोध्येत देखील त्यांच्या हाती निराशा लागली आहे. पंतप्रधान मोदींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही याचा मला आनंद आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी ४०० पारचा नारा दिला होता. ते २०० हून अधिक जागा जिंकू शकत नाहीत असे मी म्हटले होते. आता त्यांना टीडीपी (तेलगू देसम पार्टी) आणि नितीश कुमार यांचे पाय धरावे लागतील. आता ते इच्छेनुसार कायदा बनवू शकत नाहीत.
राहुल गांधींबद्दल त्या म्हणाल्या की, राहुल गांधींचे मी अभिनंदन केले आहे पण त्यांच्याकडून अद्याप उत्तर आले नाही. ते व्यग्र असतील, म्हणूनच उत्तर देऊ शकले नसावेत. मी त्यांना दोन जागांवरून लढण्यास सांगितले होते. नाहीतर ते देखील नाही मिळणार, माझे हे म्हणणे खरे झाले की नाही?