Narendra Modi 3.0 Government : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. एनडीए बहुमताच्या आकड्यावर रविवारी सरकार स्थापन करणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख यांनी पाठिंब्याचा प्रस्ताव दिल्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. त्यामुळे मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. मात्र असे असलं तरी हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे मत माजी निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी मांडले आहे. परकला प्रभाकर यांनी आधीही भाजपला २४० पेक्षा कमी जागा मिळतील असं सांगितले होते. भाजप आता चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि नितीशकुमार यांचा जेडीयू या मित्रपक्षांवर अवलंबून असला तरी ही युती कशी टिकेल, हा प्रश्न असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटलं आहे.
लोकसभेचा निकाल भाजपसाठी चपराक
निवडणुकीच्या निकालानंतर द वायरला दिलेल्या मुलाखतीमध्ये परकला प्रभाकर यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींच्या आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीला यंदाचा लोकसभेचा निकाल हा अतिशय स्पष्ट शब्दात चपराक असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटलं आहे. परकला प्रभाकर यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांचा बाहुबली सारखी व्यक्ती असा उल्लेख केला. तसेच भारतातील जनतेने या निवडणुकीतून अगदी स्पष्टपणे सांगितले की नरेंद्र मोदी काय करत होते, त्यांचा अजेंडा काय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने सरकार चालवले हे जनतेला आवडलेले नाही, असेही परकला प्रभाकर म्हणाले.
सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाची शाश्वती नाही
देशातील नवे नरेंद्र मोदी सरकार किती काळ टिकेल याची अजिबात खात्री नसल्याचेही परकला प्रभाकर यांनी म्हटलं आहे. "महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येईल का प्रश्न आहे. जरी सरकार सत्तेत आलं तरी ते लोकसभेत विश्वासदर्शक ठराव पार करु शकतात की नाही याबद्दल शाश्वती नाही," असे प्रभाकर यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींना बदल घडवून आणता आले नाहीत
"नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आलं तरी पुढील काही महिन्यांत त्यांच्याच पक्षाच्या किंवा आरएसएस किंवा एनडीएच्या मित्रपक्षांच्या दबावाखाली पंतप्रधान बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच या सरकारमधून चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार बाहेर पडण्याचीही शक्यता आहे. सध्या पंतप्रधानांसमोर जुन्या नरेंद्र मोदींना नवीन नरेंद्र मोदी बनण्याचे असं सोपे पण मोठे आव्हान आहे. नरेंद्र मोदींना त्यांच्या राजकीय कार्यपद्धती, चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्वात सर्वसमावेशक बदल घडवून आणता आलेले नाहीत," असेही परकला प्रभाकर म्हणाले.
दरम्यान, याआधी डॉ. परकला प्रभाकर यांनी नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाला १० वर्षांतील सर्वात वाईट निवडणूक निकालाकडे नेतील आणि लोकसभेतील बहुमत गमावतील, असं भाकित वर्तवले होते.